लातूर पॅटर्न, शिक्षक आणि आजचं वास्तव — माझा अनुभव

सध्या NEET पेपरफुटी, लातूर कनेक्शन आणि कोचिंग संस्कृती याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला माझे काही वैयक्तिक अनुभव आणि मनोगत व्यक्त करावंसं वाटतं.

मी २००१ साली एसएससी उत्तीर्ण झालो. त्या काळात NEET ही परीक्षा अस्तित्वात नव्हती. मेडिकल प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र CET परीक्षा होत असे. त्या काळात लातूरमध्ये काही नामांकित प्रायव्हेट कोचिंग क्लासेस होते, ज्यांनी खर्‍या अर्थाने “लातूर पॅटर्न” घडवला.

आज ज्या प्रकारे शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं दिसतं, त्याच्या अगदी विरुद्ध चित्र त्या काळात होतं. शिक्षक हे फक्त शिकवणारे नव्हते, तर विद्यार्थ्यांना घडवणारे मार्गदर्शक होते.

गणितासाठी जालनापूरकर सर, फिजिक्ससाठी पी. व्ही. कुलकर्णी सर आणि बायोलॉजीसाठी रमण ओझा सर — ही नावं मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.

त्या काळी जालनापूरकर सरांचा क्लास हा केवळ शिकवणी वर्ग नव्हता; तो विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान होता. त्यांच्या क्लासचा परिसर, तिथलं वातावरण, विद्यार्थ्यांची धडपड — सगळंच वेगळं होतं. दररोज  पहाटे पाच वाजताच्या बॅचला उपस्थित राहणं, सरांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेला आदर — हे सगळं आजही डोळ्यासमोर उभं राहतं.

त्यावेळी क्लासेसमध्ये फक्त अभ्यास व्हायचा नाही, तर एक भावनिक नातं तयार व्हायचं. सर विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने बोलायचे.  कधी आयुष्याबद्दल मार्गदर्शन. त्या वातावरणात एक आत्मीयता होती. हसत-खेळत गणित शिकण्याचा आनंद वेगळाच होता.

त्यांच्या एका बॅचमध्ये जवळपास हजार विद्यार्थी असायचे; पण त्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हे फी माफीचे असायचे. मी स्वतः त्यापैकी एक होतो. मी फक्त दोनशे रुपये फी भरत होतो. त्यांनी कधीही पैशाला महत्त्व दिलं नाही; विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिलं.

गणित शिकवण्याची त्यांची पद्धत विलक्षण होती. उदाहरणांमधून विषय समजावून सांगण्याची कला त्यांच्याकडे होती. खर्‍या अर्थाने ते “हाडाचे शिक्षक” होते.

फिजिक्सचे पी. व्ही. कुलकर्णी सर तर अप्रतिम शिकवायचे. फिजिक्समधील कठीण संकल्पना ते साध्या उदाहरणांमधून समजावून सांगायचे. त्यांच्या प्रत्येक बॅचमध्ये एक वेगळाच उत्साह असायचा. त्यांचं शिकवणं म्हणजे फक्त अभ्यास नव्हे, तर विचार करण्याची कला होती.

बायोलॉजीचे रमण ओझा सर आजही आठवतात. त्यांचा पहिला संवाद अजूनही कानात घुमतो —
“Welcome to the beautiful world of Biology.”

त्यांनी बायोलॉजी हा विषय केवळ पुस्तकातला न ठेवता जिवंत करून दाखवला. Mendelism Theory of Inheritance , Skeleton — हे विषय आम्हाला खूप जवळचे वाटायचे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दल प्रेम निर्माण केलं. जे विद्यार्थी फी भरू शकत नव्हते, त्यांना त्यांनी क्लासमध्ये छोटीमोठी कामं देऊन आर्थिक मदत केली. कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच्या मुलांसारखं उभं केलं.

खरं सांगायचं तर, लातूरची ओळख ही फक्त “लातूर पॅटर्न”मुळे नव्हती, तर त्या पॅटर्नला घडवणाऱ्या समर्पित शिक्षकांमुळे होती. त्या काळात कोचिंग क्लासेस हे व्यवसाय नव्हते; ते विद्यार्थ्यांना घडवण्याचं एक मिशन होतं.

पण आज परिस्थिती बदलली आहे. शिक्षणात मोठ्या प्रमाणात बाजारीकरण आलं आहे. “लातूर पॅटर्न” या नावाखाली हजारो कोटी रुपयांची उलाढाल, शिक्षणातील स्पर्धा, गोंधळ, राजकारण आणि काही ठिकाणी गुंडगिरीचे प्रकार ऐकायला मिळतात. विद्यार्थ्यांकडे “फी देणारी मशीन” म्हणून पाहिलं जातं, ही खंत वाटते.

आज त्या जुन्या आत्मीयतेची, त्या समर्पणाची आणि त्या शिक्षकांची खूप आठवण येते.

तुम्ही आम्हाला फक्त विषय शिकवला नाही, तर आयुष्य जगायला शिकवलं.
तुमच्यामुळे आम्ही घडलो.

मनःपूर्वक धन्यवाद.

Leave a comment