लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा आदर्श होता की आजचा कोचिंग बाजार?

लातूर पॅटर्न म्हणजे फक्त प्रायव्हेट कोचिंग क्लासेस नव्हते. तो एक काळ होता… जिथे शिक्षकांनी रात्रंदिवस मेहनत करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उभं केलं.

राजर्षी शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज , महात्मा बसवेश्वर कॉलेज असो किंवा महात्मा गांधी कॉलेज— या संस्थांमध्ये शिक्षकांनी केवळ नोकरी केली नाही, तर शिक्षणाला ध्येय मानलं. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचा त्याग, शिस्त, अभ्यासपद्धती आणि समर्पण होतं.

प्रायव्हेट क्लासेस : तेव्हा आणि आत्ता

२००५ पूर्वीचे अनेक प्रायव्हेट कोचिंग क्लासेस हे शिक्षणाची पूरक व्यवस्था म्हणून उभे होते. बडाडे सर, उपासे सर, पी. व्ही. कुलकर्णी सर, रमण ओझा सर, जोशी सर — हे सर्व मूळात शिक्षक होते. त्यांनी शिक्षणाला व्यवसाय न बनवता गुणवत्ता वाढवण्याचं माध्यम बनवलं.

त्या काळात लातूरमधील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण होते, कारण प्रवेशासाठी गुणवत्ता यादी ९० टक्क्यांच्या पुढे जात असे. त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसे. विशेषतः डिस्टिंक्शन किंवा फर्स्ट क्लासमध्ये गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस हे एक व्यासपीठ ठरत होते. या क्लासेसनी अशा विद्यार्थ्यांना स्वतःची बुद्धिमत्ता, क्षमता आणि गुणवत्ता सिद्ध करण्याची दुसरी संधी उपलब्ध करून दिली होती.

आज “लातूर पॅटर्न” हे नाव पुन्हा चर्चेत आहे. पण दुर्दैवाची बाब अशी की, आज जे काही घडताना दिसत आहे — पेपरफुटी, कोचिंग क्लासेसचा माफिया, पैशांचा खेळ, राजकीय संरक्षण आणि शिक्षणाचे व्यापारीकरण — हे मुळात लातूर पॅटर्नचे प्रतिनिधित्व करत नाही. उलट, ही त्या पवित्र संकल्पनेची बदनामी आहे.

म्हणजेच, “लातूर पॅटर्न” हा गुणवत्तेला धार देणारा मॉडेल होता — खोट्या स्वप्नांचा बाजार नव्हता.

२००८ नंतर बदललेलं वास्तव

मात्र २००८ नंतर चित्र बदलायला लागलं.

शिक्षणात अर्थकारण आलं. राजकारण आलं. आणि त्यातून निर्माण झाला “शैक्षणिक माफिया”.

आज अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस हे शिक्षणसंस्था नसून व्यवसायिक साम्राज्यं बनली आहेत. विद्यार्थी म्हणजे ग्राहक, पालक म्हणजे गुंतवणूकदार आणि “डॉक्टर-इंजिनिअर” ही विक्रीची ब्रँडिंग झाली आहे.

पेपरफुटीचे आरोप असोत किंवा निकालांमधील संशयास्पद गोष्टी — या सर्व घटना एका दिवसात घडलेल्या नाहीत. गेली अनेक वर्षे ही व्यवस्था आतून पोखरत होती. आज फक्त तिचं कुरूप वास्तव उघड होत आहे.

अमेरिकन तत्त्वज्ञ नोम चॉम्स्की यांनी आधुनिक शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना म्हटलं आहे:

“जेव्हा शिक्षण व्यवस्था कॉर्पोरेट आणि राजकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली जाते, तेव्हा ती विचार करणारे नागरिक नव्हे तर आज्ञाधारक ग्राहक तयार करते.”

आजच्या परिस्थितीकडे पाहिलं, तर हे विधान अत्यंत वास्तववादी वाटतं. शिक्षणाचा उद्देश स्वतंत्र विचार करणारे, संवेदनशील आणि सामाजिक जबाबदारी जाणणारे नागरिक घडवणे हा असायला हवा; पण आज अनेक ठिकाणी शिक्षण हे फक्त पैसा कमावण्याचं साधन बनत चाललं आहे.

गरीब पालकांची स्वप्नं आणि बाजाराचा सापळा

लातूर आणि मराठवाडा हा दुष्काळी भाग. इथली बहुतांश माणसं शेतीवर जगतात.

एक शेतकरी जमीन विकतो. आई-वडील मजुरी करतात. फक्त मुलगा “डॉक्टर” व्हावा म्हणून.

पण वास्तव काय?

शंभर विद्यार्थ्यांपैकी कदाचित दोन किंवा तीन विद्यार्थी प्रत्यक्षात त्या स्पर्धेत यशस्वी होण्याच्या पातळीवर असतात. उरलेल्या विद्यार्थ्यांना मात्र “तुमचंही होईल” अशी स्वप्नं दाखवली जातात. लाखो रुपये घेतले जातात. आणि अपयश आलं की दोष विद्यार्थ्याच्या बुद्धीवर टाकला जातो.

ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर भावनिक शोषण आहे.

डॉक्टर बनवण्याचा उद्योग

आज अशीही परिस्थिती दिसते की, काही श्रीमंत आणि प्रभावशाली लोक आपल्या मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा वापर करतात.

प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही. प्रश्न व्यवस्थेचा आहे.

जर भ्रष्ट व्यवस्थेतून डॉक्टर तयार झाले, तर ते समाजसेवा नव्हे तर नफा कमावण्याचं साधन बनतील. मग सामान्य माणसाचा जीव हा उपचारांपेक्षा पैशांवर अवलंबून राहील.

गरीब शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला, तर तो समाजाचं दु:ख समजून घेईल. पण पैशाच्या जोरावर बनवलेले डॉक्टर समाजाला सेवा देणार की बाजार निर्माण करणार — हा प्रश्न गंभीर आहे.

समाजाची सर्वात मोठी शोकांतिका

या सगळ्यात सर्वात वाईट गोष्ट कोणती?

ज्यांनी शिक्षणाचं व्यापारीकरण केलं, ज्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला, ज्यांनी गरीब पालकांची स्वप्नं विकली —

त्यांनाच समाज “यशस्वी” म्हणतो.

त्यांचं मार्केटिंग होतं. त्यांना राजकीय पाठबळ मिळतं. तेच लोक पुन्हा हिरो बनून समाजासमोर उभे राहतात.

आणि सामान्य माणूस? तो पुन्हा त्याच भ्रमात अडकतो.

लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा आदर्श होता की आजचा कोचिंग बाजार?

हा प्रश्न आता समाजाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

कारण खरा लातूर पॅटर्न हा मेहनत, शिस्त, शिक्षकांचा त्याग आणि गुणवत्तेवर उभा होता. आज जे काही दिसत आहे, ते त्या वारशाचं विकृत रूप आहे.

शिक्षण हे सेवा असतं, उद्योग नाही. आणि विद्यार्थ्यांचं भविष्य हे नफ्याचं साधन कधीच असू शकत नाही.

Leave a Reply

Discover more from Dr. Kiran Kakade (Ph.D.,LL.M.,MCA,MBA(HR))

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading